खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा,मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन

खानापुरात रविवारी सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा,मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन

खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूल येथे होणार असून खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य नारायण कापोलकर यांनी केले आहे.

दोन्ही संस्थांच्या वतीने दरवर्षी खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. प्राथमिक विभागात इयत्ता सातवीपर्यंतचे विद्यार्थी, तर माध्यमिक विभागात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. परीक्षेत सर्व विषयांचे मूलभूत ज्ञान, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. ५० बहुपर्यायी प्रश्नांची ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्राथमिक विभागासाठी अनुक्रमे रु. ३५००, २५००, २०००, १५००, १०००, ८००, ७०० व ५०० अशी बक्षिसे असतील. माध्यमिक विभागासाठी रु. ४०००, ३०००, २५००, २०००, १५००, १२००, १००० व ७०० अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची नावे शुक्रवार (ता.२०) पर्यंत मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वाझ बिल्डिंग, मिनी विधान सौध समोरील प्रबोधनकार ठाकरे वाचनालय येथे नोंदवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

खानापूर तालुक्यातील मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होण्याबरोबरच लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या परीक्षेला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतील, असा विश्वास नारायण कापोलकर यांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 13 =

error: Content is protected !!