नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर संसदेत परिधान केलेल्या महागड्या लुई व्हिटॉन (LV) बेल्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत गोंधळ सुरू असताना त्यांनी कोट सावरताना त्यांच्या कमरेतील LV लोगो असलेला काळा बेल्ट स्पष्टपणे दिसून आला. हा बेल्ट सुमारे ८० हजार रुपयांचा असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
या घटनेचा १९ सेकंदांचा व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर टीकाकारांनी भाजपच्या स्वदेशी आणि व्होकल फॉर लोकल मोहिमांशी विसंगती असल्याचा आरोप केला आहे. तरुणांना आंदोलनाचे आवाहन करणारे नेते स्वतः मात्र परदेशी लक्झरी वस्तू वापरत असल्याचे दाखवून देत टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, अनुराग ठाकूर यांच्या समर्थकांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक पार्श्वभूमी समृद्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही लुई व्हिटॉनचा स्कार्फ वापरल्याचा संदर्भ देत दुहेरी मापदंड लावले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर अनुराग ठाकूर यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या घटनेमुळे संसदेत आणि सोशल मीडियावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला असून पक्षीय वाद अधिक तीव्र झाला आहे.
