चांदीपूर (ओडिशा) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांनी सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट (SFDR) तंत्रज्ञानाची यशस्वी प्रात्यक्षिक चाचणी केली आहे. ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) येथून मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता पार पडली.
या यशस्वी प्रात्यक्षिकामुळे भारत अशा मोजक्या एलिट राष्ट्रांच्या पंक्तीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. एसएफडीआर तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या (एअर-टू-एअर मिसाईल) विकासाला मोठी चालना मिळणार असून, भारतीय हवाई दलाला रणनैतिक आघाडी मिळणार आहे.
एसएफडीआर प्रणालीमुळे क्षेपणास्त्र अधिक वेगाने, अधिक अंतरापर्यंत आणि उच्च अचूकतेने लक्ष्य भेदण्यास सक्षम होते. पारंपरिक रॅमजेट प्रणालीच्या तुलनेत हे तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह मानले जाते. भविष्यातील आधुनिक हवाई युद्धाच्या दृष्टीने ही चाचणी भारताच्या संरक्षण क्षमतेत मैलाचा दगड ठरणारी आहे.
डीआरडीओच्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि तांत्रिक पथकाच्या अथक परिश्रमांमुळे हे यश साध्य झाल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या चाचणीमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकासाला नवी दिशा मिळाली असून, आत्मनिर्भर भारत संकल्पनेला आणखी बळ मिळाले आहे.
