निपाणीत ११ प्रलंबित मागण्यांसाठी १५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

निपाणीत ११ प्रलंबित मागण्यांसाठी १५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

निपाणी, दि. १४ जून : निपाणी शहर व तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी 4JR ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने आक्रमक भूमिका घेतली असून, मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास १५ जुलै २०२६ पासून निपाणी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सत्याग्रह छेडण्याचा इशारा दिला आहे.

संस्थेच्या वतीने तहसीलदार, सीपीआय आणि निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तांना रविवारी लेखी निवेदन देण्यात आले. यामध्ये यापूर्वी अनेक वेळा विविध प्रश्नांबाबत निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्ष उपाययोजना झाल्या नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

संस्थेने प्रशासनास १५ जुलैपर्यंत मुदत देत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा तहसील कार्यालयासमोर अनिश्चितकालीन उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात परवानगीसाठीही अर्ज सादर करण्यात आला आहे.

संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करणे, निपाणी शहर गांजामुक्त करणे, बेकायदेशीर उपक्रमांवर कारवाई, महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, खासगी शाळांच्या अवाजवी शुल्कावर नियंत्रण, जवाहर सरोवराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास, शहरातील विविध नागरी समस्या सोडविणे आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, कर्नाटकचे डीजीपी यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.

संस्थेचे सचिन पोवार, ज्ञानेश्वर चव्हाण, अविनाश माने, संतोष मावरकर, विशाल कांबळे, योगेश कांबळे, युवराज शेटके, योगेश पोतदार, ए. आय. हलगले, मोहन पाटील, अशोक खांडेकर, संतोष कुर्ले, मोहम्मदशफी कुन्नथोडी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

प्रशासनाने तातडीने मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संस्थेने दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five − two =

error: Content is protected !!