युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचा संयुक्त उपक्रम; १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
बेळगाव : प्रतिनिधी : सीमाभागात मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच मराठी भाषा शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना ती सहजपणे लिहिता-वाचता यावी, या उद्देशाने युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा दि. १२ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. इंग्रजी, कन्नड किंवा इतर माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या आणि मराठी भाषा लिहिता-वाचता यावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
मातृभाषा मराठी असूनही अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता-वाचता येत नसल्याची खंत विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जाते. ही बाब लक्षात घेऊन सुलभ पद्धतीने आणि कमी कालावधीत विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता-वाचता यावी, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत मराठी भाषेतील तज्ज्ञ तसेच अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना मराठी वाचन, लेखन आणि भाषेच्या मूलभूत बाबी सहजपणे आत्मसात करता याव्यात, यावर कार्यशाळेत भर दिला जाणार आहे.
या कार्यशाळेचे यंदा पहिलेच वर्ष असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी अध्यक्ष अंकुश केसरकर : ९७३९९६३२२९ किंवा सरचिटणीस श्रीकांत कदम : ९६११७५६५२९ यांच्याशी संपर्क साधावा.
