बेळगाव : टिळकवाडी येथील शांतीनगरमधील आर्ष विद्याश्रम येथे दिनांक 28 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 143 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक आनंदराव चव्हाण तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते किशोर काकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सावरकरप्रेमी संजय रायकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी वीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन 29 मे रोजी सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमात बोलताना आनंदराव चव्हाण यांनी वीर सावरकरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सांगून त्यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा गौरव केला. तर किशोर काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक संजय रायकर यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शांतीनगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत हेबाळकर, यशवंत परदेशी आणि सुरेश सुळेभावी यांनी विशेष सहकार्य केले.
वीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
