बेळगाव : खेळांना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यातून केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळते, असे प्रतिपादन रोटरी क्लब दर्पणच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी मण्णीकेरी यांनी केले.
हॉकी बेळगाव, रोटरी क्लब दर्पण आणि रोटरी क्लब नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित वरिष्ठ व कनिष्ठ मुलींच्या प्रदर्शनीय हॉकी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
स्पर्धेत कनिष्ठ संघाने वरिष्ठ संघावर १-० अशा गोलफरकाने विजय मिळवला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेता आणि उपविजेता संघांना चषक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी खेळाची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले. सचिव सुधाकर चाळके यांनी हॉकी बेळगावमधून DYES मध्ये निवड झालेल्या खेळाडूंची माहिती दिली.
यावेळी रोटरी क्लब दर्पणच्या सचिव कावेरी करूर, संचालिका सविता वेसणे, रोटरी क्लब नॉर्थचे संचालक सोमशेखर सुतार, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू देशनूर, प्रफुल्ल काळोजी, विकास कलघटगी, सुरेश पोटे, दत्तात्रय जाधव, एस. एस. नरगोदी, दीपक वेसणे, शिवानंद गोडबोले, रमाकांत कारेकर, आशा होसमनी, सुप्रिया कारेकर, प्रिया जैन, स्नेहा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
