बेळगाव : बसरिकट्टी गावाजवळील चंदनहोसूर परिसरात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केलेल्या हरणाची सोशल वर्कर रेस्क्यू टीम बेळगावने तत्परतेने सुटका केली.
आज पहाटे चंदनहोसूर परिसरातील रहिवाशांकडून जखमी हरणाबाबत मदतीचा फोन आल्यानंतर टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले हरण रहिवासी भागाजवळ आढळून आले होते.
रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, शशिकांत अंबेवाडकर आणि राजू टक्केकर यांनी हरणाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्याला पुढील हल्ल्यापासून संरक्षण देत प्राथमिक उपचार व आवश्यक काळजी घेण्यात आली.
त्यानंतर जखमी हरणाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. वन विभागाकडून हरणावर पुढील वैद्यकीय उपचार करून त्याच्या पुनर्वसनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
वन्यजीव संकटात सापडल्यास तत्काळ मदतीसाठी धावून जाणाऱ्या सोशल वर्कर रेस्क्यू टीमच्या कार्याचे स्थानिक ग्रामस्थ तसेच प्राणीप्रेमींनी कौतुक केले आहे.
