बेळगाव : शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या “श्री गणेश फेस्टिव्हल बेळगाव-२०२६” या बहुप्रतीक्षित महोत्सवाला येत्या रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता भव्य उद्घाटन सोहळ्याने सुरुवात होणार आहे. महिला आणि नागरिकांच्या सहभागातून विविध स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव असा बहुरंगी कार्यक्रम चार दिवस चालणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी मिलेट्सपासून गोड व तिखट पदार्थ बनविण्याची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राळा, बाजरी, राजगिरा, नाचणी, ज्वारी आदी मिलेट्सचा वापर करून पदार्थ सादर करावे लागणार आहेत. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सोमवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांना २.५ बाय २.५ फूट जागेत रांगोळी काढावी लागणार आहे. या स्पर्धेसाठीही रोख पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी “मंगळागौर“ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नक्षत्र ग्रुप बेळगाव याचे सादरीकरण करणार आहे. यावेळी महिलांसाठी पारंपरिक खेळ, गाणी आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता “नवरत्न सन्मान” कार्यक्रम होणार आहे. समाजसेवा, साहित्य, कला, संगीत, उद्योग, क्रीडा, श्रमसेवा, कृषी आणि सामाजिक संस्था या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन श्री भक्ती महिला को.ऑप क्रेडिट सोसायटी ली. ,श्री राजमाता महिला मल्टिपर्पज सोसायटी ली, श्री माता को ऑप क्रेडिट सोसायटी ली., ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.
