खानापूर : यांनी खानापूर तालुक्यातील हळशी वाडा येथे अवघ्या १५ दिवसांच्या विक्रमी कालावधीत दोन तलावांचे पुनरुज्जीवन पूर्ण करून ग्रामस्थांसाठी दिलासादायक काम उभे केले आहे. पक्ष्यांसाठी स्वतंत्र बेटाची निर्मिती करत पर्यावरणपूरक पद्धतीने हा प्रकल्प राबविण्यात आला.
या दोन्ही तलावांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे चार एकरांपेक्षा कमी असून, यांच्या सीएसआर निधीच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे, तीव्र उन्हाळ्याच्या काळातही या तलावांमधील नैसर्गिक पाण्याचे झरे अजूनही जिवंत आणि कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
या प्रकल्पांतर्गत गावातील एका विहिरीतील गाळ काढण्याचे कामही करण्यात आले. त्यामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्यास आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हळशी वाडा गावाला ऐतिहासिक महत्त्वही लाभले आहे. हे गाव कदंब राजवंशाची राजधानी असलेल्या ‘हळशी’च्या जवळ वसलेले आहे. कर्नाटकच्या इतिहासात प्रशासकीय कामकाजात कन्नड भाषेचा वापर करणारा कदंब राजवंश हा पहिला राजवंश मानला जातो.
शेती आणि पशुधनावर अवलंबून असलेल्या गावाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा जलसंधारण प्रकल्प मोठा वरदान ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. प्यास फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
