“व्यापार शुल्कभरूनही सुविधा नाहीत, भाडेतत्वावर गाळे घेण्यासाठी दबाव”; जय किसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांचा संताप, संडे मार्केटमध्ये त्रास थांबवण्याची मागणी

“व्यापार शुल्कभरूनही सुविधा नाहीत, भाडेतत्वावर गाळे घेण्यासाठी दबाव”; जय किसान भाजी मार्केट व्यापाऱ्यांचा संताप, संडे मार्केटमध्ये त्रास थांबवण्याची मागणी

सात महिन्यांपासून संडे मार्केटमध्ये व्यापार, कर भरूनही सुविधा नाहीत; भाडे तत्त्वावर गाळे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप

बेळगाव : जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द झाल्यानंतर एपीएमसी येथील संडे मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांचा संघर्ष अद्याप कायम असून, “न्यायालयीन लढाई सुरू असताना आम्हाला किमान सन्मानाने व्यापार करू द्या,” अशी आर्त मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून संडे मार्केटमध्ये व्यवसाय करत असूनही कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द झाल्यानंतर या प्रकरणावर बेळगाव जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत अंतिम निर्णय होईपर्यंत व्यापाऱ्यांना एपीएमसीच्या संडे मार्केटमध्ये व्यापार करण्यास मुभा देण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयात निर्णय विरोधात गेला असला तरी व्यापाऱ्यांनी हार मानलेली नसून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्याची तयारी असल्याचे समजते. तोपर्यंत सर्व व्यवहार संडे मार्केटमध्ये करण्याचे ठरले होते आणि त्यानुसार व्यापाऱ्यांनी स्थलांतर स्वीकारून गेल्या सात महिन्यांपासून तेथे व्यापार सुरू ठेवला आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते सर्व नियमांचे पालन करत असून व्यवसायावर ०.६ टक्के प्रमाणे एपीएमसीला व्यापार शुल्क भरत आहेत. मात्र कर भरूनही त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. संडे मार्केट परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची, पार्किंगची, शेडची, सुरक्षा व्यवस्थेची तसेच इतर मूलभूत सुविधांची मोठी कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या उन्हाळ्यातच अशी अवस्था असेल तर पुढील पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होईल, अशी भीतीही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

याउलट संडे मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास अधिकृत परवानगी असतानाही एपीएमसीमधील काही दुकानमालकांकडून व्यापाऱ्यांवर मुख्य मार्केटमध्ये येऊन गाळे भाड्याने घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एपीएमसी प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडून असा कोणताही आदेश नसताना दुकानमालकांकडून सातत्याने दबाव आणला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

यावेळी व्यापारी नेते यांनी सांगितले की, जय किसान भाजी मार्केटशी संबंधित सुमारे २५० व्यापारी आहेत. “एपीएमसीमध्ये सर्व व्यापाऱ्यांना पुरेसे गाळे उपलब्ध नाहीत. जे गाळे उपलब्ध आहेत त्यांचे भाडे प्रचंड आहे. एवढ्या मोठ्या भाड्याने गाळे घेऊन छोट्या व्यापाऱ्यांना व्यापार करणे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. अंतिम निकाल लागेपर्यंत संडे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

एका व्यापाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, “जर आम्ही अवैधरित्या व्यापार करत असू, तर आजही शेतकरी आमच्याकडेच का येतात? ते आम्हालाच माल का पुरवतात? याचा विचार सरकारने करायला हवा.” काही दुकानमालक शेतकऱ्यांना योग्य भाव देत नसल्याने शेतकरी जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवतात आणि त्यांनाच भाजीपाला पुरवठा करतात, असा दावा त्यांनी केला. व्यापार करण्यास असमर्थ असलेले काही घटकच आता व्यापाऱ्यांवर गाळे भाड्याने घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी यांनी बोलताना सांगितले की, जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी गेली ६० ते ७० वर्षे बेळगावमध्ये व्यापार करत आहेत. “आमच्या तीन पिढ्या या व्यवसायात गेल्या आहेत. किल्ला परिसरातील भाजी मार्केट बंद झाल्यानंतर आम्हाला एपीएमसीमध्ये स्थलांतरित करण्यात आले. मात्र येथे व्यापाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “आजही आम्ही संडे मार्केटमध्ये व्यापार करत असताना आम्हाला जबरदस्तीने दुकाने भाड्याने घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.” जय किसान भाजी मार्केट बंद झाल्यामुळे थेट आणि अप्रत्यक्षपणे सुमारे १० ते १५ हजार लोकांच्या रोजगारावर परिणाम झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

“सरकारने प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेत जय किसान भाजी मार्केटला पुन्हा परवाना द्यावा. तोपर्यंत संडे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना दिला जाणारा मानसिक त्रास तात्काळ थांबवावा,” अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × two =

error: Content is protected !!