नेहरू नगर डी-मार्ट रस्ता बनला ‘मायन्स रोड’; जड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिक संतप्त

नेहरू नगर डी-मार्ट रस्ता बनला ‘मायन्स रोड’; जड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिक संतप्त

बेळगाव : शहरातील नेहरू नगर येथील डी-मार्ट परिसरातील रस्ता सध्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे अक्षरशः ‘मायन्स रोड’ बनल्याची परिस्थिती निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, वाढता अपघाताचा धोका आणि फुटलेल्या ड्रेनेज पाइपलाइनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज सकाळी ८ वाजल्यापासून डी-मार्ट चौक परिसरातून जेली, दगड, वाळू, विटा आणि माती वाहून नेणारे ५० ते ६० हून अधिक ट्रक वेगाने धावत असतात. याशिवाय एपीएमसी बाजाराकडे जाणारी जड वाहने पहाटे ४ वाजल्यापासून सकाळपर्यंत आणि दिवसभर या मार्गाचा वापर करत आहेत. रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या टँकरची वाहतूकही सुरूच असते.

याच मार्गावर हृदयरोग विशेष रुग्णालय तसेच KLE रुग्णालय असल्याने आपत्कालीन रुग्णवाहिकांना वाहतुकीतून मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे तातडीच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

तसेच या रस्त्यावरून शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या डॉक्टरांनाही वाहतुकीमुळे वेळेत पोहोचणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक रहिवाशांनी आरोप केला की, सततच्या जड वाहनांच्या दाबामुळे रस्त्याखालील ड्रेनेज पाइपलाइन आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन वारंवार फुटत आहेत. अनेक घरांच्या ड्रेनेज लाईन्सना तडे गेले असून गेल्या एक वर्षापासून फुटलेल्या गटाराचे पाणी परिसरातील जागृत मंदिराजवळ वाहत आहे.

या समस्येबाबत महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांवरच वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

परिसरातील नागरिकांनी तातडीने जड वाहनांवर निर्बंध घालावेत, रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि ड्रेनेज समस्या सोडवावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + twenty =

error: Content is protected !!