तनुज सिंगची दोन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई; आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पटकावली एकूण १३ पदके
बेळगाव : प्रतिनिधी
मैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत क्लबच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १३ पदकांची कमाई केली. यामध्ये तनुज सिंग याने दोन सुवर्णपदकांसह एकूण सात पदके पटकावत विशेष चमक दाखवली.
या स्पर्धेत तनुज सिंग याने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि १०० मीटर बटरफ्लाय या प्रकारांत सुवर्णपदके मिळवली. तसेच ५० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारांत रौप्यपदके पटकावली. याशिवाय रिले प्रकारात एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवत त्याने एकूण सात पदकांची कमाई केली.
कुमार चिन्मय बागेवाडी याने ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदक मिळवले. तसेच रिले प्रकारातही रौप्यपदक पटकावले. कुमार आदी शिरसाठ याने रिले प्रकारात रौप्यपदक मिळवून संघाच्या यशात योगदान दिले.
कुमारी वेदा खानोलकर हिनेही उल्लेखनीय कामगिरी केली. तिने ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बटरफ्लाय आणि रिले प्रकारात प्रत्येकी एक कांस्यपदक मिळवत एकूण तीन पदके आपल्या नावावर केली.
या सर्व जलतरणपटूंना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव आणि रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच हिंद सोशलच्या सेक्रेटरी सावित्री दोड्डणावर, अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते, राजू मुंदडा आणि शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी मिळवलेल्या या यशामुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
