वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण आणि बुद्धिबळ या विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये कैवल्य घोरपडे (९५ किलो), बालाजी पाटील (५६ किलो), समीक्षा हिरोजी (४८ किलो) आणि कलाश्री बागेवाडी (५३ किलो) यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडे याची ५० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर बटरफ्लाय, ४×१०० मीटर फ्रीस्टाइल रिले आणि ४×१०० मीटर मेडले रिले या प्रकारांसाठी निवड झाली आहे. तसेच वेदांत तरळे याची ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारांसाठी निवड झाली आहे.
कुस्ती स्पर्धेत बालाजी पाटील (५१ किलो) याने राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. बुद्धिबळ स्पर्धेत तन्मयी पावले आणि रितेश मुचंडीकर यांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, क्रीडाशिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, वैभवी दळवी आणि प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवर्ग आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
