मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

खो-खो, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्समध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

बेळगाव : प्रतिनिधी

सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी खो-खो, बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत माध्यमिक विभागातील मुलांच्या आणि मुलींच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच प्राथमिक विभागातील मुलींच्या संघाने प्रथम, तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.

डी. पी. शाळेच्या सभागृहात झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्राथमिक विभागातून तन्मयी पावले, तर माध्यमिक विभागातून रितेश मुचंडीकर आणि रोहिणी बोकमूरकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हा क्रीडांगणावर पार पडलेल्या तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेतही मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी आपली चमक दाखविली. यामध्ये इंद्रजीत चौगुले याने १०० मीटर धावण्यात द्वितीय, २०० मीटर धावण्यात प्रथम, तर लांब उडीत द्वितीय क्रमांक मिळविला. अभय पाटील याने ८० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकाविला. वैष्णवी पाटील हिने ८० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय, तर सृष्टी पावशे हिने उंच उडीत प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, वैभवी दळवी आणि प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 2 =

error: Content is protected !!