मराठी अर्जांशिवाय मतदार पडताळणी नको; सुनील बाळेकुंद्री यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी

मराठी अर्जांशिवाय मतदार पडताळणी नको; सुनील बाळेकुंद्री यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेदरम्यान मतदारांना केवळ कन्नड भाषेतील अर्ज वितरित करण्यात येत असल्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांनी मराठी अर्जांची ठाम मागणी करत निवडणूक कर्मचाऱ्यांना माघारी पाठविल्याची घटना भांदूर गल्ली येथे घडली.

मतदार यादी पडताळणीसाठी आलेल्या निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुनील बाळेकुंद्री यांना कन्नड भाषेतील अर्ज दिला. मात्र, “मला कन्नड भाषा अवगत नाही. मला मराठी भाषेतील अर्ज द्या,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या अर्ज केवळ कन्नड भाषेतच उपलब्ध असल्याचे सांगितल्यानंतर बाळेकुंद्री यांनी तो अर्ज स्वीकारण्यास नकार दिला.

यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला पूर्वीच्या प्रक्रियेची आठवण करून देत सांगितले की, यापूर्वी बेळगावसह सीमाभागातील निवडणुकांमध्ये अर्ज, परिपत्रके आणि इतर कागदपत्रे कन्नडसोबत मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्यात येत होती. तसेच भाषिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांच्या अनुषंगाने सन २००८ मध्ये निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट आदेश जारी केले होते. त्यामुळे मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध होईपर्यंत प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यानंतर सुनील बाळेकुंद्री यांनी बेळगाव व सीमाभागातील मराठी भाषिकांना आवाहन करत, “कन्नड भाषेतील अर्ज स्वीकारू नका. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आपल्या हक्काचे मराठी अर्जच मागा,” असे सांगितले. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + 12 =

error: Content is protected !!