धमकी देणाऱ्यांच्या विरोधात मराठी भाषिक आक्रमक; कपिल भोसले यांच्या पाठीशी मराठी समाज एकवटला!

धमकी देणाऱ्यांच्या विरोधात मराठी भाषिक आक्रमक; कपिल भोसले यांच्या पाठीशी मराठी समाज एकवटला!

हॉटेल विराट बंद पाडण्याची, परवाना रद्द करण्याची धमकी दिल्याचा आरोप; मराठी व्यावसायिकाला त्रास दिल्यास रस्त्यावर उतरू, रमाकांत कोंडुसकर यांचा इशारा

बेळगाव : काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्यामुळे मराठी व्यावसायिकाला लक्ष्य करून धमकावण्याचा प्रकार समोर आल्याने बेळगावातील मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. हॉटेल विराटचे मालक कपिल भोसले यांना हॉटेल बंद पाडण्याची आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार करून परवाना रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी हॉटेल विराट येथे धाव घेत भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत धमकी देणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला.

काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होणे हा गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करत मराठी भाषिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असताना, एखाद्या आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला लक्ष्य करणे आणि त्याच्या व्यवसायावर गदा आणण्याची धमकी देणे, हे निषेधार्ह असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

१ नोव्हेंबर रोजी झालेल्या काळ्या दिनाच्या फेरीत कपिल भोसले सहभागी झाले होते. याचाच राग मनात धरून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे. हॉटेल बंद पाडू आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार करून परवाना रद्द करू, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे मराठी व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मराठी व्यावसायिकांना हात लावाल तर मराठी समाज गप्प बसणार नाही!

या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना रमाकांत कोंडुसकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, “आमचा लढा केंद्र सरकारच्या विरोधात आहे. १९५६ पासून आम्ही १ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन पाळत आहोत. या फेरीत असंख्य मराठी भाषिक सहभागी होतात. कपिल भोसले हेदेखील फेरीत सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.”

ते पुढे म्हणाले, “बेळगावातील व्यावसायिक महापालिकेच्या नियमावलीनुसार परवाने घेऊन व्यवसाय करतात. नियमांनुसार फलक लावले जातात. असे असतानाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही सर्वजण आमच्या व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

धमक्यांना भीक घालणार नाही; मराठी बांधवांची एकजूट!

या घटनेची माहिती मिळताच मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी हॉटेल विराट येथे एकत्र येत कपिल भोसले यांना पाठिंबा दर्शविला. कोणत्याही व्यावसायिकाला त्याच्या भाषिक अस्मितेमुळे किंवा आंदोलनातील सहभागामुळे लक्ष्य केले जात असेल, तर त्याविरोधात एकजुटीने आवाज उठवला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. धमकी देण्याचे प्रकार सुरूच राहिल्यास समस्त मराठी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सागर पाटील, गणेश दड्डीकर, सुनील बोकडे, किरण हुद्दार, शेखर तळवार, प्रवीण रेडेकर, सूरज चव्हाण, गजानन बैलुरकर, राकेश पाटील, सुमित मोरे, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम, आकाश भेकणे, राजू वर्पे, प्रियेश गौंडाडकर, जयदीप उपसकर, राजेंद्र बैलुर, श्रीपाद काकतीकर, जयेश भातकांडे, दर्शन सावगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठी भाषिकांच्या एकजुटीचा संदेश

कपिल भोसले यांच्या पाठीशी उभे राहून मराठी भाषिकांनी एकजुटीचे दर्शन घडविले. व्यावसायिकांना धमकावून दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा ठाम संदेश या माध्यमातून देण्यात आला. आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × four =

error: Content is protected !!