बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून ‘हॉकी बेळगाव’ संघटनेच्या वतीने आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी ‘मेजर ध्यानचंद ट्रॉफी’ ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत दादा कोंडुस्कर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुल्लापा होसमानी, सेक्रेटरी सुधाकर चाळके, डायरेक्टर सागर पाटील, मुतगा कृषी उत्पन्न सोसायटीचे अध्यक्ष सचिन पाटील तसेच शहापूर श्रीराम सेना हिंदुस्तानचे प्रमुख भरत नागरोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हॉकीसारख्या मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील अनेक क्रीडाप्रेमी, मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या आयोजनातून बेळगावातील हॉकी खेळाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
