बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक कावळे संकुल, टिळकवाडी येथील युवा समिती कार्यालयात अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी १९८६ मधील कन्नडसक्ती आंदोलनाची आठवण करून दिली. कर्नाटक शासनाने डॉ. गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्वत्र कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरुवात झाली. याच्या निषेधार्थ समितीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले होते. १ जून १९८६ रोजी तत्कालीन नेते शरद पवार यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात दाखल होत सत्याग्रह केला. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदी असतानाही आंदोलन यशस्वी झाल्याने प्रशासनाने शरद पवार यांना अटक केली. त्यानंतर सीमाभागात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. बेळगावमध्ये हरताळ पाळण्यात आला. परिस्थिती चिघळल्यानंतर आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य पत्करावे लागले, तर अनेक कार्यकर्त्यांना अटक करून विविध तुरुंगात डांबण्यात आले.
हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी सोमवार, दि. १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असून सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे नववे वर्ष असून यावर्षी ३०० शाळांना साहित्य वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच युवा समितीच्या वतीने जुलै महिन्यात मराठी माध्यमातील दहावी परीक्षेत बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले. यावेळी सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अक्षय बांबरकर, सुरज चव्हाण, महांतेश अलगोंडि, अश्वजीत चौधरी, रोहन कुंडेकर, आनंद पाटील, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.
