मच्छे मराठी मॉडेल शाळेत गांधी जयंती, शास्त्री जयंती उत्साहात; १.३० लाखांचा डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट

मच्छे मराठी मॉडेल शाळेत गांधी जयंती, शास्त्री जयंती उत्साहात; १.३० लाखांचा डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट

मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेत महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती आणि शाळेला देणगी स्वरूपात मिळालेल्या ६५ इंची डिजिटल स्मार्ट बोर्डचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. अभिषेक अलॉय प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक एम. एन. आचार्य यांच्या हस्ते डिजिटल स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन विकास समिती (SDMC) आणि शाळेच्या वतीने एम. एन. आचार्य यांचा पुस्तक, रोपटे, पुष्पहार आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

आचार्य कुटुंबाच्या सहकार्यातून शाळेला सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचा डिजिटल स्मार्ट बोर्ड देणगी स्वरूपात प्राप्त झाला आहे. काही कारणांमुळे आचार्य यांचे सुपुत्र मयूर माधव आचार्य आणि सून मनविता मयूर आचार्य कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल संपूर्ण आचार्य कुटुंबाचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एम. एन. आचार्य यांनी कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्यामागील कंपनीची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे होण्यासोबतच समाजासाठी योगदान देणारे दातेही व्हावे आणि सामाजिक बांधिलकी कायम जपावी, असे आवाहन त्यांनी केले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने मनात ठेवावी, असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या कष्टांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, जिद्द आणि जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.

शाळेला मिळालेल्या डिजिटल स्मार्ट बोर्डमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रमय, संवादात्मक आणि अधिक परिणामकारक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SDMC अध्यक्ष गजानन छप्रे होते. सूत्रसंचालन संतोष चोपडे सर यांनी केले, तर शेरलेकर मॅडम यांनी आभार मानले.

यावेळी SDMC सदस्य परशुराम कोलेकर, प्रशांत नांदोडकर, अमोल लाड, महेश लाड, अनिल करडी, अमित बाळेकुंद्री, रूपा कनबरकर, रुक्मिणी लाड, चेतन सायानक, नागेश शानभाग, विनायक शानभाग यांच्यासह इतर समिती सदस्य, शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + two =

error: Content is protected !!