श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती वैचारिक वातावरणात साजरी

श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती वैचारिक वातावरणात साजरी

साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला मानाचा मुजरा

मच्छे : येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वैचारिक वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष सुशील धामणेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर आयोजित चर्चासत्रात संतोष जैनोजी, विनायक चौगुले, केतन चौगुले, संदीप वाघोजी, प्रशांत नांदोडकर आणि गजानन मजुकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा विविध अंगांनी आढावा घेतला. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, समाजप्रबोधनातील योगदान, शाहिरी आणि साहित्यिक कार्यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांचे औपचारिक शिक्षण अवघे दीड दिवस झाले असले तरी ज्ञानाची प्रबळ जिज्ञासा आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी स्वअध्ययनातून स्वतःला घडवले. पुढे कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी कष्टकरी, वंचित आणि शोषित समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले.

“पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच “माझी मैना गावाकडे राहिली” ही त्यांची शाहिरी आजही जनमानसात तितकीच लोकप्रिय असल्याचे सांगण्यात आले.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून त्यांच्या साहित्याला जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाण आणि संवेदनशीलता विकसित करावी, असे आवाहन उपस्थितांनी केले.

यावेळी श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयात अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्या व साहित्य उपलब्ध असून वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम वैचारिक वातावरणात संपन्न झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 6 =

error: Content is protected !!