मराठी शाळांमध्ये कन्नड वर्ग व मराठी पाठ्यपुस्तकांच्या अनुपलब्धतेबाबत खानापूर समितीचा गट शिक्षणाधिकाऱ्यांना जाब

मराठी शाळांमध्ये कन्नड वर्ग व मराठी पाठ्यपुस्तकांच्या अनुपलब्धतेबाबत खानापूर समितीचा गट शिक्षणाधिकाऱ्यांना जाब

खानापूर : मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कन्नड वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे मराठी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध न करून देण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूरने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने गट शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कन्नड, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांची पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध होत असताना केवळ मराठी पाठ्यपुस्तकांची छपाई व वितरण रखडण्यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली. मराठी ही या भागातील हजारो विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि प्रथम भाषा असताना तिच्याबाबतच सातत्याने दुजाभाव का केला जात आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षणावर घाव घालण्याचा हा कर्नाटकी प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप समितीने केला. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कन्नड वर्ग भरविण्याच्या निर्णयालाही समितीने ठाम विरोध दर्शविला. मराठीबहुल भागांमध्ये मराठी शाळांना मान्यता देण्यात अडथळे निर्माण केले जात असताना कन्नड शाळांना मात्र सहज मान्यता दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा आणणारे निर्णय तातडीने मागे घेऊन मराठी पाठ्यपुस्तके त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच मराठी शाळांमध्ये कन्नड वर्ग सक्तीने सुरू करण्याचा प्रयत्न थांबवावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

याबाबत संबंधित शिक्षण विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + 1 =

error: Content is protected !!