बेंगळुरू, १२ ऑगस्ट : सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी कर्नाटक सरकारच्या अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांवर कठोर कारवाई सुरू केली असून, राज्यात अशा उत्पादनांच्या विक्री व वितरणावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यभर गुटखा, पान मसाला तसेच तंबाखू किंवा निकोटीनयुक्त प्रतिबंधित उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री याविरोधात विशेष तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३०(२)(अ) तसेच अन्न सुरक्षा व मानके (विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध) नियम, २०११ अंतर्गत राज्य सरकारने १० ऑगस्ट २०२६ रोजी अधिसूचना जारी करून तंबाखू व निकोटीनयुक्त उत्पादनांच्या विक्री व वितरणावर बंदी लागू केली आहे. ही अधिसूचना जारी झाल्यापासून एक वर्षासाठी संपूर्ण कर्नाटकात लागू राहणार आहे.
अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखू व निकोटीनयुक्त प्रतिबंधित उत्पादनांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण होत असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित माहिती द्यावी. व्यसनमुक्त आणि निरोगी कर्नाटक घडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही विभागाने म्हटले आहे.
