बेळगाव, दि. २ जून : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कंग्राळी खुर्द (ता. व जि. बेळगाव) यांच्या शतक महोत्सवी सोहळ्याला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३० व ३१ मे रोजी पार पडलेला हा सोहळा “न भूतो न भविष्यति” असा अविस्मरणीय ठरला.

या शतक महोत्सवानिमित्त शाळेच्या १९८६ ते १९९३ बॅचमधील सुमारे ५९ माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन महोत्सव समितीकडे तब्बल ५० हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द केली. या निधी संकलनासाठी बॅचचे ग्रुप अॅडमिन नितीन पी. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना संतोष कोल्हे, रवळनाथ यादव, ज्योती जाधव, सीमा पाटील, सचिन शिवंगेकर, विशाल खटावकर, शाम मोहनगेकर तसेच इतर सहाध्यायांची मोलाची साथ लाभली.
महोत्सवादरम्यान माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेच्या माजी शिक्षकांसमवेत दोन दिवस घालवत जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवन पुन्हा अनुभवले.
दोन दिवस चाललेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही या बॅचच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाळेच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा साक्षीदार ठरलेला हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
