कंग्राळी (खुर्द) : येथील उच्च प्राथमिक सरकारी मराठी शाळेचा शतकोत्तर वर्धापन दिन सोहळा दोन दिवस विविध कार्यक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, विद्यमान विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, मान्यवरांचे मार्गदर्शन, माजी शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या १९८९-९० ते १९९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत जुन्या सहाध्यायी व शिक्षकांसोबत भावनिक क्षण अनुभवले.
यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेने दिलेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जपलेली मैत्री याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या भावना उपस्थितांच्या मनाला भिडल्या.
शतकमहोत्सवाचे औचित्य साधून १९८९-९० ते १९९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींच्या वतीने शाळेला ५० खुर्च्यांची भेट देण्यात आली. या भेटीचा स्वीकार करताना शाळा प्रशासनाने सांगितले की, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी या खुर्च्या अत्यंत उपयुक्त ठरणार असून माजी विद्यार्थ्यांची ही देणगी शाळेसाठी प्रेरणादायी आहे.
शतकमहोत्सवामुळे शाळेच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान झाला असून माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले आहे. हा सोहळा सर्वांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी आनंद पावशे, प्रवीण पाटील, अमर बेन्नाळकर, प्रभाकर खटावकर, वैशाली पाटील, रेश्मा पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
