बेळगाव : जायंटस् गृप ऑफ बेळगांव मेनतर्फे जुने बेळगांव नाका येथे समाजसेवेत अग्रगण्य, प्रामाणिक, कष्टाळू आणि होतकरू अशा विविध आठ वार्डांतील २१ व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे समाजसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना जायंटस् गृपचे अध्यक्ष म्हणाले की, समाजासाठी निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अशा व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास ते अधिक जोमाने आणि जिद्दीने समाजकार्यात कार्यरत राहतात. त्यामुळे समाजसेवकांचा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सदस्य सुनिल मुरकुटे यांचे अलीकडे मातृछत्र हरपले होते, तर मिलिंद खांडेकर यांचे पितृछत्र हरपले होते. त्यांच्या स्मरणार्थ समाजसेवकांना टोपीरूपी छत्र आणि मानधन देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष अरुण काळे, युनिट डायरेक्टर संजय पाटील, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, गावडू पाटील, ईश्वर पाटील, मिलिंद खांडेकर, सुनिल मुरकुटे, महादेव केसरकर, दिगंबर किलेकर, दुर्गेश हरिते, श्रीशैल माळशेटी, अशोक हलगेकर, आकाश लाटूकर, आनंद कुलकर्णी, महादेव भस्मे, अनिल चौगुले, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
