बेळगाव, ३ जुलै : समाजासाठी अत्यंत कठीण आणि संवेदनशील परिस्थितीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या श्मशानभूमी कर्मचारी, शववाहिका चालक व कर्मचारी तसेच शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) विभागातील कर्मचाऱ्यांचा शांती वृद्धाश्रम, चंदन कमल केअर सेंटर आणि विकी मेहता यांच्या संयुक्त विद्यमाने, माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला.
पाई रिसॉर्ट येथे आयोजित या कार्यक्रमात समाजातील या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम करत त्यांना दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तूंच्या भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. माधव प्रभू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. जी. गदाद, बेळगाव महानगरपालिकेचे उपआयुक्त उदयकुमार तलवार, दिनेश वर्नेकर, श्रीपाद पाई आणि विजय कोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी या कर्मचाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवेला गौरवपूर्ण शब्दांत सलाम केला तसेच आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना माजी महापौर विजय मोरे यांनी श्मशानभूमी कर्मचारी, शववाहिका कर्मचारी आणि पोस्टमॉर्टेम विभागातील कर्मचारी हे समाजातील खरे अनामिक योद्धे असल्याचे सांगितले. कोणतीही परिस्थिती असो, हे कर्मचारी अखंडपणे आपले कर्तव्य बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांना समाजाने सन्मान, प्रोत्साहन आणि पाठबळ देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्कार समारंभानंतर सर्व सन्मानित कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांसाठी पाई रेस्टॉरंटमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमास अॅलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद होळी, गंगाधर पाटील, मायकेल पिंटो, सूरज गवळी यांच्यासह अनेक स्वयंसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. शेवटी सर्व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
