बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर, हिंदवाडी येथे गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसतर्फे रविवारी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी २५ हून अधिक योगसाधकांनी १०८ सूर्यनमस्कार घालून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना योगगुरू शंकरराव कुलकर्णी म्हणाले, “योग महर्षी पतंजली यांनी सुरू केलेल्या योगविद्येचा प्रसार आज जगभर झाला आहे. योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक मान्यता मिळाली असून आज या उपक्रमाला बारा वर्षे पूर्ण होत आहेत.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व आणि योगाभ्यासाचे फायदे याविषयी माहिती दिली. त्यानंतर शंकरराव कुलकर्णी यांनी योगाचा इतिहास उलगडून सांगत निरोगी व आरोग्यसंपन्न जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
यावेळी अनेक योगसाधकांनीही मनोगते व्यक्त करत योगामुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात योगगुरू शंकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच आनंदराव शिरगावकर यांच्या हस्ते योगगुरू कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण पटेल, शिवाजी मुचंडी, संदीप मोरे, छगन पटेल, दीपक आजरेकर, सुवर्णा कलबुर्गी, संध्या कुलकर्णी, वीणा कित्तूर, संगीता बागी, अनिता अंकलगी आदींसह अनेकांनी विशेष परिश्रम घेतले.
योगाभ्यास, सूर्यनमस्कार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला उपस्थित साधकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
