कागवाड येथे निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागवाड येथे निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कागवाड, दि. ३ : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि शिवानंद महाविद्यालय, कागवाडच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत साहित्यिक व वक्तृत्व कौशल्याचे प्रभावी दर्शन घडविले.

स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मराठी विभाग प्रमुख व शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, प्रो. बी. डी. दामन्नावर, डॉ. आनंदकुमार जक्कन्नावर, प्रा. मनोज कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. तळवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील प्रभाव अधोरेखित केला. त्यांच्या साहित्यामधून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाचे वास्तव प्रभावीपणे मांडले गेले असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाण विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.

पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि प्रभावी अभिव्यक्तीची सवय जोपासावी, या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व समकालीन विषयांवर प्रभावी मांडणी करत परीक्षकांची दाद मिळवली. विचारांची स्पष्टता, भाषाशैली, आशयाची समृद्धता आणि प्रभावी सादरीकरणामुळे स्पर्धांचा दर्जा उंचावला.

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी व डॉ. अमोल पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून मार्गदर्शनही केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव, शिवानंद महाविद्यालयाचा मराठी विभाग तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार, प्रा. अशोक आलगोंडी, प्रो. बी. डी. दामन्नावर, डॉ. आनंदकुमार जक्कन्नावर, प्रा. मनोज कोरे आदी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − five =

error: Content is protected !!