रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या बहुचर्चित ‘धुरंधर 2 : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत चाहत्यांची मनं जिंकली होती. आता हा ब्लॉकबस्टर चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या आवृत्तीपेक्षा ओटीटीवरील आवृत्ती वेगळी असणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 14 मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. भारतातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाऊ शकतो. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, ओटीटीवरील या आवृत्तीला ‘धुरंधर 2 : द रिव्हेंज (रॉ अँड अनदेखा)’ असे नाव देण्यात येणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा रनटाईम 3 तास 49 मिनिटांचा होता, तर ओटीटी आवृत्तीचा रनटाईम 3 तास 52 मिनिटांचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काही नवे आणि याआधी न पाहिलेले सीन्स पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत भारतात 1140 कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन केले, तर जागतिक स्तरावर तब्बल 1791 कोटी रुपयांची कमाई केली. या यशानंतर ‘धुरंधर’ फ्रँचायझी पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत निर्मात्यांनी दिले आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडून यावर्षाअखेरपर्यंत या फ्रँचायझीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
