मंडोळी रोडवरील सीबीजी प्रकल्पाच्या जागेची GAIL कडून पाहणी; ग्रामस्थांचा विरोध तीव्र

मंडोळी रोडवरील सीबीजी प्रकल्पाच्या जागेची GAIL कडून पाहणी; ग्रामस्थांचा विरोध तीव्र

बेळगाव : शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पाबाबत महत्त्वाची घडामोड घडली असून, शनिवारी गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) च्या अधिकाऱ्यांनी मंडोळी रोड परिसरातील प्रस्तावित जागेची पाहणी केली. दरम्यान, मंडोळी आणि हंगरगा गावातील ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू असल्याने प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दिल्लीहून आलेल्या GAIL च्या प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने विशेषतः या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या सुमारे नऊ एकर जागेची पाहणी केली. यावेळी बेळगाव महानगरपालिकेचे पर्यावरण अभियंते आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते.

पाहणीदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी GAIL च्या पथकाला जागेचा आराखडा, परिसरातील स्थिती, रस्ते संपर्क, तांत्रिक व्यवहार्यता तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती दिल्याचे समजते. तसेच प्रकल्प उभारल्यास आसपासच्या गावांवर होणारा परिणाम, पर्यावरणीय बाबी आणि इतर तांत्रिक पैलूंचाही प्राथमिक स्तरावर आढावा घेण्यात आला.

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ओला कचरा प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती करण्यासाठी हा सीबीजी प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. केंद्र सरकारच्या ‘गोबरधन’ (GOBARdhan) योजनेअंतर्गत सुमारे ₹54.20 कोटी खर्चाचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

मात्र, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून जोरदार विरोध होत आहे. शुक्रवारी मंडोळी आणि हंगरगा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत या भागात उभारू नये, अशी मागणी केली होती.

यापूर्वीही तुर्मुरीसह शहर परिसरातील इतर प्रस्तावित ठिकाणी जमीन व स्थानिक विरोधाच्या कारणांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता मंडोळी रोडवरील जागेची GAIL कडून पाहणी सुरू झाल्याने प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असला तरी प्रशासनाला तांत्रिक गरज आणि स्थानिकांच्या भावना यामध्ये समतोल साधावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − thirteen =

error: Content is protected !!