व्यंगचित्र ही बोलकी कला; रेषांमधून व्यक्त होतात भावना : जगदीश कुंटे

व्यंगचित्र ही बोलकी कला; रेषांमधून व्यक्त होतात भावना : जगदीश कुंटे

बेळगाव : व्यंगचित्राची भाषा ही रेषांची असून काहीवेळा ती वळणदार तर काहीवेळा वेडीवाकडी असते. मात्र त्या रेषांमधून समाजातील वास्तव, भावना आणि परिस्थिती प्रभावीपणे व्यक्त होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी केले.

बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रातर्फे आयोजित ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘व्यंगचित्र : एक बोलकी कला’ या विषयावर बोलत होते. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर तसेच सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. कुंटे यांनी व्यंगचित्राचे सामाजिक आणि राजकीय असे दोन प्रमुख प्रकार असल्याचे सांगितले. सामाजिक व्यंगचित्र रेखाटताना सभोवतालच्या परिस्थितीची जाण आणि निरीक्षणशक्ती अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी उपस्थितांसमोर काही अर्कचित्रे काढून दाखवली तसेच व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके सादर करत रसिकांची दाद मिळवली.

कार्यक्रमात उद्योगपती यांच्या हस्ते श्री. कुंटे यांचा गणेशाची चांदीची मूर्ती, भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अश्विनी पाटील, रविंद्रनाथ जुवली, शोभा हतरकी, अरुण धोत्रे, जगमोहन अगरवाल आणि प्रकाश कुडतरकर यांनी हिंदी, मराठी व कन्नड गीते सादर केली. भरत गावडे यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेंद्र देसाई यांनी केले. शिवराज पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, तर के. एल. मजूकर यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − one =

error: Content is protected !!