बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीत मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, बेनॉन स्मिथ पीयू कॉलेजची संरक्षक भिंत कोसळल्याने परिसरातील गटार व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. गटारे तुंबल्यामुळे पावसाचे व सांडपाण्याचे पाणी थेट आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील ड्रेनेज आणि गटार व्यवस्थेची अनेक दिवसांपासून दुरवस्था होती. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. अखेर मुसळधार पावसात कॉलेजची भिंत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती व ढिगारा गटारात अडकून पाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला.
यामुळे पाणी थेट निवासी भागात शिरले असून अनेक घरांतील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही घरांमध्ये गटाराचे दूषित पाणी शिरल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडलेली दुर्घटना आहे,” असा आरोप रहिवाशांनी केला.
नागरिकांनी प्रशासनाकडे नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत व भरपाई देण्याची मागणी केली असून, परिसरातील गटारे आणि ड्रेनेज व्यवस्था त्वरित दुरुस्त करावी तसेच संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
या घटनेमुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
