काळा दिन आणि जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांबाबत रविवारी बेळगाव तालुका म. ए. समितीची बैठक

काळा दिन आणि जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांबाबत रविवारी बेळगाव तालुका म. ए. समितीची बैठक

२५ ऑक्टोबर रोजी खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे बैठक; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : प्रतिनिधी

येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन तसेच आगामी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ असलेल्या मराठा मंदिर येथे ही बैठक होणार आहे.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी तत्कालीन म्हैसूर राज्यात आणि सध्याच्या कर्नाटक राज्यात सीमाभागाचा समावेश करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने मूक सायकल फेरी काढून सीमाप्रश्नाकडे शासनाचे आणि देशाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

यंदाच्या काळ्या दिनाच्या आयोजनाबाबत तसेच कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या आगामी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांच्या संदर्भात कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत काळ्या दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि आगामी निवडणुकांबाबत समितीची भूमिका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण घटक समितीचे सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 2 =

error: Content is protected !!