बेळगाव रिंग रोड प्रकल्प: मोबदला रखडल्याने शेतकऱ्यांचा संताप; खासदार शेट्टर यांचा अधिकाऱ्यांना दम

बेळगाव रिंग रोड प्रकल्प: मोबदला रखडल्याने शेतकऱ्यांचा संताप; खासदार शेट्टर यांचा अधिकाऱ्यांना दम


बेळगाव: 2018 मध्ये ‘भारतमाला’ योजनेअंतर्गत मंजूर झालेला सुमारे ₹3,800 कोटींचा रिंग रोड प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जात असला, तरी जमीन मोबदल्याचा प्रश्न अद्याप गंभीरच आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी (34 किमी) ₹1,622 कोटी मंजूर झाले असून सुमारे 80 टक्के जमीन संपादन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यातील सर्व अडथळे दूर झाल्याचे सांगितले जात असले तरी बेळगुंदी, नावगे, वाघवडे, झाड शहापूर या गावांतील अनेक शेतकऱ्यांना अद्याप जमीन मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस संबंधित गावांतील शेतकरी, खासदार जगदीश शेट्टर, नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान खासदार शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खडसावून लवकरात लवकर चारही गावांतील जमीनधारकांना मोबदला देण्याच्या सूचना दिल्या.

रिंग रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रशासनाने तातडीने मोबदला वितरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − five =

error: Content is protected !!