भजनाशिवाय तरणोपाय नाही; भजनात मोठी शक्ती – ह. भ. प. यल्लाप्पा गिरमल महाराज

भजनाशिवाय तरणोपाय नाही; भजनात मोठी शक्ती – ह. भ. प. यल्लाप्पा गिरमल महाराज

सार्वजनिक वाचनालयाच्या दहाव्या संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन; २९ भजनी मंडळांचा सहभाग

बेळगाव : प्रतिनिधी

“भजन हे केवळ कलियुगातच नव्हे, तर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगातही होते. भजनामुळे मन तृप्त होते आणि समाधान प्राप्त होते. भजनामध्ये मोठी शक्ती असून ते मनाला प्रसन्न करते. त्यामुळे देवाला भजन प्रिय आहे. भजनाशिवाय तरणोपाय नाही, हे लक्षात घेऊन साधुसंतांनी भजनाचा मार्ग मोकळा करून दिला,” असे प्रतिपादन ह. भ. प. श्री यल्लाप्पा गिरमल महाराज (सांबरा) यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दहाव्या संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरमल महाराज उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष रघुनाथ बांडगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे कार्यवाह प्रसन्न हेरेकर यांनी केले, तर सहकार्यवाह शिवाजी हंगिरकर यांनी आभार मानले.

या स्पर्धेत एकूण २९ भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पाच महिला भजनी मंडळांनी आपली भजने सादर केली. त्यापूर्वी सदाशिवनगर येथील श्रीहरी महिला भजनी मंडळाने आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी गिरमल महाराज यांनी १९७७ पासून संभाजी उद्यानात सुरू झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण परंपरेचाही उल्लेख केला. या परंपरेपासून प्रेरणा घेत गेली ४८ वर्षे सलग ८०० भक्तांसह पायी वारी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिला व पुरुष गटातील भजनांचे सादरीकरण

या स्पर्धेअंतर्गत गुरुवारी महिला गटातील ११ भजनी मंडळांची भजने सादर होणार आहेत, तर शुक्रवारी आणि शनिवारी पुरुष गटातील १३ भजनी मंडळे आपली कला सादर करणार आहेत.

भजन परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − 5 =

error: Content is protected !!