सांगलीतील कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या; समस्त मराठा समाज बेळगावची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगलीतील कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या; समस्त मराठा समाज बेळगावची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई, दि. 24 ऑगस्ट 2026 : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे घडलेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबातील अनाथ मुलांना शासकीय मदत व कायदेशीर संरक्षण मिळावे, या मागणीसाठी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे रहिवासी असलेले मोहन नागाप्पा केसरेकर (वय 45) आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (वय 35) हे उपजीविकेसाठी सांगलीतील कुपवाड परिसरात वास्तव्यास होते. दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने चाकू आणि हातोड्याने त्यांच्यावर अत्यंत क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहन आणि मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांची दोन लहान मुले मनाली आणि मनोज पूर्णपणे अनाथ झाली आहेत.

या घटनेमुळे मराठा समाजासह सकल हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.

यावेळी शिष्टमंडळात रमाकांत दादा कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, मुकेश बारदेश, नंदू इंदलकर, गणेश कदम, कपिल भोसले, विनोद बिर्जे, निलेश मुदगेकर आणि विराज मोरकुंबे यांची उपस्थिती होती.

शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची, प्रकरण फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची, विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करून लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी केली. तसेच अनाथ झालेल्या दोन्ही मुलांचे पालकत्व राज्य सरकारने स्वीकारून त्यांना दरमहा प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीचे लेखी आश्वासन द्यावे आणि मुख्य फिर्यादी व साक्षीदारांना तातडीने पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे तसेच फास्ट-ट्रॅक कोर्टामार्फत खटल्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

या दुःखद प्रसंगी संपूर्ण समाज केसरेकर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून पीडितांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असा निर्धार शिष्टमंडळाने व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 18 =

error: Content is protected !!