बेळगाव : गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण. मात्र या भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड देत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, केळकर बाग — ‘बेळगांवचा कैवारी’ यांच्या वतीने यंदा ‘ज्ञान दान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
गणपती बाप्पा हे विद्या, ज्ञान आणि कलेचे दैवत मानले जाते. याच भावनेतून बाप्पाच्या चरणी पूजेचे साहित्य अर्पण करण्याऐवजी पुस्तके, वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वस्तू दान करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
या उपक्रमातून जमा होणारे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला आपल्या छोट्याशा योगदानातून हातभार लागावा आणि त्याच्या भविष्यास नवी दिशा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
‘पूजेच्या साहित्याऐवजी ज्ञानाचे साहित्य बाप्पाच्या चरणी अर्पण करूया आणि शिक्षणाची ज्योत अधिक तेजस्वी करूया,’ असा संदेश मंडळाने दिला आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शैक्षणिक साहित्य दान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
‘ज्ञान दान हेच श्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
आयोजक :
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, केळकर बाग, बेळगाव
॥ बेळगांवचा कैवारी ॥
