वेटलिफ्टिंगमध्ये ८५ किलो वजन उचलत पटकावले सुवर्णपदक; शहराचा मान उंचावला
बेळगाव : बेंगळुरू येथे आयोजित ५ व्या मिनी कर्नाटक क्रीडाकूट-२०२६ या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या आयुषी आनंद धामणेकर हिने वेटलिफ्टिंगमध्ये शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.
१४ ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित या स्पर्धेत ६१ किलो वजनगटातील मुलींच्या वेटलिफ्टिंग प्रकारात आयुषीने एकूण ८५ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला. तिने स्नॅच प्रकारात ३५ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात ५० किलो वजन उचलत आपल्या उत्कृष्ट कौशल्याची प्रचिती दिली.
आयुषी ही कॅम्प येथील सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या यशामागे प्रशिक्षक प्रदीप जुवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आयुषीच्या या उल्लेखनीय यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही तिने अशीच यशाची शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
