बेळगांव – बेळगांव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ऑनलाइन बस तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म redBus आणि Pauls Travels या ट्रॅव्हल कंपनीला प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल संयुक्तपणे नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. बस प्रवासादरम्यान अचानक बिघडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते.
तक्रारदार अशोक कदम व त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी redBus मार्फत Pauls Travels ची बेळगांव–मुंबई एसी स्लीपर बस 29 फेब्रुवारी 2024 रोजी बुक केली होती. मात्र 1 मार्च 2024 रोजी पहाटे पुण्यापासून सुमारे 40 किमी अंतरावर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बस दुरुस्तीस अनेक तास लागणार असल्याचे चालकाने सांगितले, परंतु पर्यायी प्रवासाची कोणतीही व्यवस्था redBus किंवा Pauls Travels कडून करण्यात आली नाही.
प्रवाशांना स्वतःच्या खर्चाने दुसरी व्यवस्था करून उशिरा मुंबई गाठावी लागली. या गैरसोयीबद्दल तक्रारदारांनी ग्राहक मंचात धाव घेतली होती. त्यांनी तिकीट रक्कम परतावा तसेच व्यवसायिक नुकसान झाल्याचा दावा करत 5 लाख रुपयांची भरपाई मागितली होती.
या प्रकरणी आयोगाचे अध्यक्ष संजीव व्ही. कुलकर्णी आणि सदस्य एस.एस. कड्रोल्लीमठ यांनी सुनावणी करत तक्रारदारांचा 5 लाखांचा दावा पुराव्याअभावी फेटाळला, मात्र प्रवाशांना झालेल्या मानसिक त्रास व गैरसोयीबद्दल भरपाई देणे योग्य असल्याचे नमूद केले.
आयोगाचे आदेश:
- तिकीट रक्कम ₹4,380 पूर्ण परतावा
- 1 मार्च 2024 पासून प्रत्यक्ष भुगतान होईपर्यंत 8 टक्के वार्षिक व्याज
- मानसिक त्रासासाठी ₹20,000 नुकसानभरपाई
- खटल्याचा खर्च ₹5,000
redBus ने आपण फक्त ऑनलाइन तिकीट मध्यस्थ असल्याचा दावा केला होता, मात्र आयोगाने हा युक्तिवाद फेटाळून लावत redBus आणि Pauls Travels यांच्यात व्यावसायिक करार असल्याने दोघेही संयुक्तपणे जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.
Pauls Travels प्रकरणात नोटीस देऊनही आयोगासमोर हजर राहिले नाही. त्यामुळे एकतर्फी सुनावणी करून निकाल देण्यात आला.
या निर्णयामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म्सची जबाबदारी स्पष्ट झाली असून, प्रवाशांच्या हक्कांना बळ मिळाले आहे.
