‘बेधडक शक्तिस्वरूप’ नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर; ग्रामीण आणि शहर विभागातील विजेत्यांची घोषणा

‘बेधडक शक्तिस्वरूप’ नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर; ग्रामीण आणि शहर विभागातील विजेत्यांची घोषणा

कोनेवाडीच्या सार्वजनिक श्री दुर्गामाता युवक मंडळाला ग्रामीण विभागात प्रथम क्रमांक; शहर विभागात नरवीर रासलीला दांडिया ग्रुप वडगाव अव्वल

बेळगाव : प्रतिनिधी

बेधडक बेळगावच्या वतीने मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा उत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बेधडक शक्तिस्वरूप उत्कृष्ट नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बेळगाव परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांमध्ये धार्मिक उत्साह, कलात्मकता, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ग्रामीण आणि शहर विभागातील विजेत्यांसह विशेष पारितोषिकांचे मानकरीही जाहीर करण्यात आले आहेत.

ग्रामीण विभागातील विजेते

ग्रामीण विभागात सार्वजनिक श्री दुर्गामाता युवक मंडळ, कोनेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. छत्रपती श्री शंभूराजे मित्र मंडळ, विजयनगर यांनी द्वितीय, तर श्री दुर्गा भवानी युवक मंडळ, हलगा यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

शहर विभागातील विजेते

शहर विभागात नरवीर रासलीला दांडिया ग्रुप, कारभार गल्ली, वडगाव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, एसटीएम समर्थ नगर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

तृतीय क्रमांक विभागून तीन मंडळांना देण्यात आला. यामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, अखंड फुलबाग गल्ली; सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, केळकर बाग; तसेच नेताजी सुभाष युवक मंडळ, भारत नगर पहिली गल्ली, शहापूर यांचा समावेश आहे.

चौथा क्रमांक विभागून चार मंडळांना देण्यात आला. यामध्ये सार्वजनिक श्री दुर्गामाता युवक मंडळ, आनंदवाडी, शहापूर; श्री बाल शिवाजी युवक मंडळ, रामामेस्त्री अड्डा, कपिलेश्वर रोड; सार्वजनिक नवरात्रोत्सव मोरया युवक मंडळ, शाहूनगर; तसेच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, शाहूनगर यांचा समावेश आहे.

पाचवा क्रमांक विभागून दोन मंडळांना देण्यात आला. श्री हनुमान तालीम मंडळ, कोरे गल्ली आणि श्री शिवशक्ती युवक मंडळ, नानावाडी यांनी हा क्रमांक मिळवला.

विशेष पारितोषिकांचे मानकरी

स्पर्धेत उत्कृष्ट देखावा आणि मूर्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीसाठी विशेष पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत.

  • उत्कृष्ट देखावा: मराठा युवक मंडळ, होसूर.
  • उत्कृष्ट देखावा: सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, रामलिंग गल्ली, जुने बेळगाव.
  • उत्कृष्ट देखावा: राजमाता युवक मंडळ, मुजावर गल्ली.
  • विधायक मूर्ती: सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, चव्हाट गल्ली.

मूर्ती, देखावा आणि सामाजिक कार्याच्या आधारे स्पर्धा

या स्पर्धेत सहभागी मंडळांचे मूल्यमापन देवीची मूर्ती, मंडळाचा देखावा आणि मंडळाकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याच्या आधारे करण्यात आले. एकूण गुणांपैकी ५० टक्के गुण देवीच्या मूर्तीसाठी, तर उर्वरित ५० टक्के गुण देखावा आणि सामाजिक कार्यासाठी निर्धारित करण्यात आले होते.

परीक्षकांच्या गुणांसोबतच बेधडक बेळगावच्या सोशल मीडिया पेजवर संबंधित मंडळांच्या व्हिडिओंना मिळालेल्या पसंतीचाही विचार करण्याची तरतूद स्पर्धेच्या नियमावलीत करण्यात आली होती. विजयादशमीपर्यंत मिळालेल्या लाईक्सची मोजणी करणे, तसेच बूस्टिंग किंवा बनावट लाईक्सद्वारे स्पर्धेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाला स्पर्धेतून बाद करणे, अशा अटीही ठेवण्यात आल्या होत्या. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले होते.

बेळगाव परिसरातील विविध नवरात्र उत्सव मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व सहभागी मंडळांनी देवीची आकर्षक मूर्ती, भव्य देखावे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक वाढवला.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांचे तसेच स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिलेल्या सर्व मान्यवरांचे बेधडक बेळगावच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले असून, सर्व विजेत्या मंडळांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

लवकरच बक्षीस वितरण सोहळा

स्पर्धेतील सर्व विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यासाठी लवकरच बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बेधडक बेळगावच्या वतीने देण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × three =

error: Content is protected !!