इस्कॉन बेळगावत बलराम जयंती उत्साहात साजरी; भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे मार्गदर्शन

इस्कॉन बेळगावत बलराम जयंती उत्साहात साजरी; भक्तीरसामृत स्वामी महाराजांचे मार्गदर्शन

बेळगाव : भगवान श्रीकृष्णांचे पहिले विस्तारित रूप असलेल्या भगवान बलराम यांची जयंती शुक्रवारी इस्कॉन बेळगावच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवान बलराम यांच्या प्राकट्याचे महत्त्व विशद केले. “भगवान श्रीकृष्णांची अनेक विस्तारित रूपे आहेत. त्यामध्ये भगवान बलराम हे त्यांचे पहिले विस्तारित रूप असून त्यांचा जन्म श्रीकृष्णांच्या अगोदर रोहिणी मातेच्या गर्भातून झाला,” असे त्यांनी सांगितले.

बलराम जयंतीनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता भगवानांचा विशेष अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. प्रवचनात त्यांनी भगवान बलराम यांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

महाराजांनी श्रीमद् भागवताच्या दहाव्या स्कंधातील दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाचा संदर्भ देत भगवान श्रीकृष्णांनी योगमायेला दिलेल्या आदेशाचे वर्णन केले. देवकीच्या गर्भातील भगवानांचा अंश रोहिणीच्या गर्भात स्थानांतरित करण्यात आला आणि त्यानंतर भगवान बलराम यांचा जन्म झाला, अशी कथा त्यांनी भाविकांना सांगितली.

भगवान कोण आहेत आणि त्यांच्या दिव्य लीलांचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी श्रीमद् भागवताचे अध्ययन आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच भगवान श्रीकृष्णांची श्रीराम, बलराम, वराह आदी अनेक रूपे असली तरी सर्व रूपांचे मूळ स्त्रोत भगवान श्रीकृष्णच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवचनानंतर भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेतला.

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विशेष कथाकथन

श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त इस्कॉन मंदिरात शनिवारपासून 4 सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे श्रीकृष्ण कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. तसेच रात्री साडेआठ वाजल्यानंतर महाआरती आणि सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.

या आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 2 =

error: Content is protected !!