चव्हाट गल्लीतील निकृष्ट UGD कामामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याचा धोका

चव्हाट गल्लीतील निकृष्ट UGD कामामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याचा धोका

विहीर, बोरवेल आणि नळाच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचा आरोप; संतप्त महिलांचा अधिकाऱ्यांना जाब

बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात नव्याने टाकण्यात आलेल्या भूमिगत गटार (UGD) पाईपलाईनच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ड्रेनेज चेंबरचे बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्याने सांडपाणी झिरपून ते परिसरातील विहीर, बोरवेल तसेच पिण्याच्या नळाच्या पाण्यात मिसळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी सकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.

चव्हाट गल्ली परिसरात अलीकडेच नवीन UGD पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने ड्रेनेज चेंबरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आणि अयोग्य पद्धतीने केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, चेंबरमधून सांडपाणी बाहेर झिरपून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बुधवारी सकाळी महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी परिसरातील संतप्त महिलांनी अभियंत्यांना जाब विचारत तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली. निकृष्ट कामामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पाहणीनंतर महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी संबंधित ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवून दूषित पाण्याचा पुरवठा रोखावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 8 =

error: Content is protected !!