मराठी विद्यानिकेतनमध्ये बालवाडीच्या चिमुकल्यांचा रात्रनिवास; ८० मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठी विद्यानिकेतनमध्ये बालवाडीच्या चिमुकल्यांचा रात्रनिवास; ८० मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

बेळगाव : शाळा म्हणजे केवळ अभ्यास आणि शिक्षण असे समीकरण असताना, मराठी विद्यानिकेतन शाळेने बालवाडीतील चिमुकल्यांसाठी अनोखा रात्रनिवास उपक्रम आयोजित करून शिक्षणासोबत आनंददायी अनुभवांची पर्वणी दिली. ‘रात्रनिवासाचे आम्ही स्टार’ या संकल्पनेतून २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शिशू वर्गातील ८० मुलांनी सहभाग घेतला.

घरापासून आणि आई-बाबांपासून दूर राहून शिक्षक आणि बालवाडी कर्मचाऱ्यांसोबत शाळेत रात्र घालवण्याचा मुलांचा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे खेळ, नाचगाणी, गोष्टी आणि विविध मनोरंजक उपक्रमांमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.

शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रंगीबेरंगी कागदी टोप्या घालून मुलांचे शाळेत आगमन झाले. प्रार्थना, संस्कारगीत आणि अखंड म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुलांनी भडंग आणि उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. पुढे ‘रात्रनिवासाचे आम्ही स्टार’ या कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुलांसोबत नृत्य, पोवाडा, नाटुकले आणि गोष्टींचे सादरीकरण केले. बालवाडीतील शिक्षकांनी ‘अंधाराची जादू आणि चांदण्याची पार्टी’ या विषयावर नाटुकले सादर केले. संगीत खुर्ची आणि नृत्याच्या कार्यक्रमामुळे शाळेचा परिसर मुलांच्या किलबिलाटाने दुमदुमून गेला.

रात्री ९.३० वाजता सर्व मुलांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यामध्ये शिरा, गुलाबजाम, बटाटा-फ्लॉवरची भाजी, पापड, पुलाव आणि वरण अशा स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता. त्यानंतर शाळेच्या परिसरात शेकोटी पेटवण्यात आली. शेकोटीभोवती गोलाकार फिरत ‘बेळगावचा म्हातारा शेकोटीला आला’ या गाण्यावर मुलांनी ठेका धरला. शिक्षकांनी सांगितलेल्या गाण्यांवर नृत्य करत मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. शेवटी मुलांना आईस्क्रीम देण्यात आले.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ३५ हून अधिक पालकांनी घेतलेला सक्रिय सहभाग. सजावट करण्यापासून ते स्वयंपाक तयार करण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या पालक, शिक्षक आणि बालवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे पार पाडल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी पालकांना आभारपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी मुलांनी व्यायाम केला. त्यानंतर दूध आणि बिस्किटांचा आस्वाद घेत या रात्रनिवास उपक्रमाची सांगता झाली.

या उपक्रमासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शिक्षण समन्वयक सविता पवार, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले यांच्यासह रेणू पवार, नयन परमोजी, भारती शिराळे, अश्विनी हलगेकर, वरदा देसाई, प्रतिभा चौथे, तेजश्री हंडे, श्रद्धा पावशे, मंजुषा पाटील, सुनीता पाटील, संज्योत बांदेकर, धीरजसिंह राजपूत, दत्ता पाटील, आशा जाधव, वैभवी मोरे आणि किशोर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुलांमध्ये स्वावलंबन, शिस्त, आत्मविश्वास आणि एकमेकांशी जुळवून घेण्याची वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा रात्रनिवास उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =

error: Content is protected !!