कवी गुरुनाथ किरमटे यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम ‘शब्दांच्या पाऊलखुणा’

कवी गुरुनाथ किरमटे यांच्या कवितांचा विशेष कार्यक्रम ‘शब्दांच्या पाऊलखुणा’

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ या विशेष काव्यात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती कॉलेज कॅम्पस, कॅम्प, बेळगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कवी गुरुनाथ किरमटे यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करण्यात येणार असून, त्यानंतर निमंत्रित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

कवी गुरुनाथ मनोहर किरमटे हे बेळगावमधील कवी, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. जी. जी. टी. आय. कॉम्प्युटर एज्युकेशनचे संस्थापक असलेले किरमटे गेल्या २२ वर्षांपासून संगणक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर सुमारे १५० कविता आणि २०० चारोळ्यांचे लेखन केले आहे. बेळगाव परिसरातील विविध साहित्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणूनही त्यांचा सहभाग असतो.

एप्रिल २०२५ मध्ये सह्याद्री प्रतिष्ठान आणि सैनिक वेल्फेअर असोसिएशन, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार व्हावा, या उद्देशाने त्यांनी आजवर सुमारे आठ हजार पुस्तके विविध शाळा आणि विद्यार्थ्यांना भेट दिली आहेत. त्यांचा पहिला कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.

शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त करणाऱ्या आणि कवितांमधून जीवनानुभव मांडणाऱ्या कवी गुरुनाथ किरमटे यांच्या साहित्यिक प्रवासाचा परिचय करून देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी राहणार आहेत. संस्थेचे सचिव सुधाकर गावडे यांनी साहित्यप्रेमी, कवी आणि रसिकांनी सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!