लोकमान्य ग्रंथालयातर्फे बेळगावच्या चार साहित्यिकांचा साहित्य पुरस्काराने सन्मान

लोकमान्य ग्रंथालयातर्फे बेळगावच्या चार साहित्यिकांचा साहित्य पुरस्काराने सन्मान

‘जो समाज परिपक्व असतो, त्याला विनोद कळतो. हा एक आनंददायी कार्यक्रम आहे. ग्रंथ हे समाजाचे सुख असते’ – डॉ. रमेश वरखेडे

बेळगाव : साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने लोकमान्य ग्रंथालयातर्फे यंदापासून साहित्य पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच वर्षी बेळगाव आणि परिसरातील विविध साहित्य प्रकारांत लेखन करणाऱ्या चार साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. शोभा नाईक, प्रा. डॉ. द. तु. पाटील आणि सुश्री पूजा भडांगे यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळकवाडी येथील लोकमान्य ग्रंथालय-वरेरकर नाट्य संघ सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. नाशिकचे थोर विचारवंत, ज्येष्ठ संपादक आणि लेखक डॉ. रमेश वरखेडे यांच्या हस्ते चारही साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुस्तक आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. मंगला वरखेडे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या मुख्य भाषणात डॉ. रमेश वरखेडे यांनी लोकमान्य ग्रंथालयाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ग्रंथालयाच्या माध्यमातून साहित्यिकांचा गौरव करण्याची परंपरा सुरू करणे ही आनंददायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथपाल रंजना कारेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले. ज्ञानप्रवर्तनाच्या प्रक्रियेत ग्रंथपालाची भूमिका उत्प्रेरकाप्रमाणे म्हणजेच कॅटॅलिस्टसारखी असते. वाचनसंस्कृती वाढविण्यात आणि समाजाला ज्ञानाच्या दिशेने घेऊन जाण्यात ग्रंथपालांचे योगदान महत्त्वाचे असते, असे त्यांनी नमूद केले.

समाजाच्या जडणघडणीत विनोदाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, की समाज परिपक्व असेल तरच त्याला विनोदाची खरी जाण असते. समाजाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी विनोद महत्त्वाची भूमिका बजावतो. हा एक आनंददायी कार्यक्रम असून ग्रंथ हे समाजाचे सुख असते. त्यांनी समीक्षा, कथा, कविता आणि लोककथा या साहित्यप्रकारांविषयीही सविस्तर माहिती दिली. प्रत्येक मूल प्रतिभावंत असते, त्याच्यातील प्रतिभा ओळखून तिला योग्य व्यासपीठ देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना चारही सन्मानित साहित्यिकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. आपल्या साहित्यिक प्रवासात यळ्ळूर साहित्य संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक कै. अनंत मनोहर, लोकमान्य ग्रंथालय, विविध वाचनालये, प्रकाशक आणि रसिक वाचक यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. आपल्या कर्मभूमीत मिळालेला हा पुरस्कार विशेष आनंद देणारा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुरस्कारामुळे साहित्यिकांना प्रोत्साहन मिळते, त्यांच्या कामाला नवी दिशा मिळते, तसेच अधिक प्रगल्भतेने लेखन करण्याची आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात मराठी विद्या निकेतन आणि वि. गो. साठे प्रबोधिनी यांच्या वतीनेही चारही पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा पुष्पगुच्छ आणि भेटकार्ड देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावंतवाडी येथील कवयित्री शरयू आसोलकर यांच्या दुःखद निधनाबद्दल उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. पाहुण्यांचा परिचय करून देण्याबरोबरच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलकचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी डॉ. रमेश वरखेडे यांचे पुस्तक देऊन स्वागत केले, तर ग्रंथपाल रंजना कारेकर यांनी डॉ. मंगला वरखेडे यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या चारही साहित्यिकांचा परिचय माधव कुंटे आणि अनुजा पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी माधव कुंटे यांनी उपस्थित मान्यवर, साहित्यिक आणि रसिकांचे आभार मानले.

लोकमान्य ग्रंथालयाच्या या उपक्रमामुळे बेळगाव परिसरातील साहित्यिकांच्या साहित्यिक योगदानाला हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, नव्या पिढीमध्ये वाचन आणि साहित्यनिर्मितीची आवड निर्माण होण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे अर्थसाहाय्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 4 =

error: Content is protected !!