आमदार अभय पाटील यांच्या हस्ते सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन; देश-विदेशातील १२०० हून अधिक स्केटर्सचा सहभाग!

आमदार अभय पाटील यांच्या हस्ते सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन; देश-विदेशातील १२०० हून अधिक स्केटर्सचा सहभाग!

बेळगाव : बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आयोजित सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी देशभरातील २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश तसेच परदेशातून मोठ्या संख्येने स्केटिंगपटू सहभागी होत आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि सेंटर विभागातील स्पर्धकांसह गल्फ विभागातील दुबई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, यूएई, बहरीन, शारजा, येमेन आणि कुवेत येथील स्केटर्सचाही सहभाग असणार आहे. या स्पर्धेत १२०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटू आपले कौशल्य दाखवणार आहेत.

दि. १६ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकवर या स्पर्धा पार पडणार आहेत. तर रोड स्केटिंगच्या स्पर्धा बीएसएनएल कार्यालयासमोरील रस्त्यावर आयोजित करण्यात आल्या आहेत.

उद्घाटनप्रसंगी आमदार अभय पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बिर्ला इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या स्फूर्ती यांनी आमदार अभय पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यांनी उपस्थित स्केटर्सना मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन समारंभाला ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. प्रेमानंद जाधव, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळूरकर यांच्यासह देश-विदेशातून आलेले स्केटर्स, पालक, बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावान स्केटर्सना आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा बेळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × three =

error: Content is protected !!