ट्रेकिंगमुळे शारीरिक क्षमतेसोबतच राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित होते : ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय

ट्रेकिंगमुळे शारीरिक क्षमतेसोबतच राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित होते : ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय

बेळगावमध्ये एनसीसीच्या ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्पला उत्साहात प्रारंभ; देशभरातील ५१० कॅडेट्सचा सहभाग

बेळगाव : ट्रेकिंगमुळे केवळ शारीरिक क्षमता वाढत नाही, तर आत्मविश्वास, चिकाटी, नेतृत्वगुण आणि आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती विकसित होते. तसेच देशाच्या विविध राज्यांतील कॅडेट्स एकत्र आल्याने राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, सेना मेडल बार, विशिष्ट सेवा मेडल यांनी केले.

बेळगाव एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित आठ दिवसीय ऑल इंडिया बेळगाव ट्रेकिंग कॅम्पच्या शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जाधवनगर येथील २६ कर्नाटक बटालियन एनसीसीच्या वतीने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून देशाच्या विविध राज्यांतून एकूण ५१० कॅडेट्स सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना ब्रिगेडियर उपाध्याय म्हणाले की, एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, साहस, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांसारखे गुण विकसित होतात. ऑल इंडिया ट्रेकिंग एक्स्पेडिशनसारख्या उपक्रमांमुळे कॅडेट्सना शालेय आणि महाविद्यालयीन वातावरणाबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात साहसाचा अनुभव घेता येतो. सध्या १० ते १५ किलोमीटर चालणारे कॅडेट्स भविष्यात सराव आणि तयारीच्या जोरावर ५० किलोमीटरपर्यंत चालण्याची शारीरिक व मानसिक क्षमता विकसित करू शकतात.

या ट्रेकिंग कॅम्पमध्ये विविध राज्यांतील कॅडेट्स सहभागी झाल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, राहणीमान आणि विचारपद्धती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. परस्पर संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता व सहकार्याची भावना अधिक बळकट होईल. कॅडेट्सनी या संधीचा पुरेपूर लाभ घेत ट्रेकिंगचा आनंद घेताना शिस्त, सुरक्षितता आणि संघभावना जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगाव एनसीसी ग्रुपचे ग्रुप कमांडर कर्नल सी. राजशेखर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांचे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.

यावेळी २६ कर्नाटक बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील डागर, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. रेधू, सेना मेडल, सुभेदार मेजर कल्लाप्पा पाटील यांच्यासह एनसीसीचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध राज्यांतून आलेले कॅडेट्स उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ट्रेकिंग मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विविध राज्यांतील कॅडेट्सनी उत्साहपूर्ण वातावरणात ट्रेकिंगसाठी प्रस्थान केले.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेलगत असलेल्या पश्चिम घाटातील निसर्गरम्य जंगल परिसरातून ही ट्रेकिंग मोहीम पार पडणार आहे. आठ दिवसांच्या या उपक्रमातून कॅडेट्सना साहस, निसर्गभ्रमंती, शारीरिक क्षमता, संघभावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव घेता येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =

error: Content is protected !!