गाणी, अभंग, भावगीते आणि कवितांनी रंगला कार्यक्रम; ८१व्या वर्षी वनिता जोशी यांचे बहारदार नृत्य
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बेनकनहळी येथील घरकुल वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील आजी-आजोबांच्या सहवासात आनंदाचे क्षण घालवले. महिला आणि पुरुष मिळून जवळपास २६ सभासदांनी या उपक्रमात सहभागी होत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमात हिंदी, मराठी आणि कन्नड चित्रपटांतील गाण्यांसह अभंग, भावगीते आणि कवितांचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे वनिता जोशी यांनी वयाच्या ८१व्या वर्षीही बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. वृद्धाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सर्व सभासद आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक या आनंदसोहळ्यात समरस झाले होते.
या करमणूक कार्यक्रमात विश्वास धुराजी, भारती गावडे, चंद्रशेखर गायकवाड, रविंद्र हंपीहोल्ली, भरत गावडे, सुरेंद्र व योगिनी देसाई, रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, स्वाती माने, उदय देशपांडे, पुंडलिक दळवी, विजयमाला पाटील, अश्विनी पाटील, शशिकांत शिंदे, कृष्णा इंदूलकर, प्रकाश कुडतरकर, शुभांगी गिडे, विजय वाईगडे, अनंत सावंत, अरविंद मुतगेकर, सुरेश प्रभू खानोलकर, पी. एन. रायबागी आणि औदुंबर शेट्ये यांनी सहभाग घेतला.
यावेळी सिद्धाप्पा व सुनित्रा देसाई या दाम्पत्याने वैवाहिक जीवनाची ५५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विठ्ठल व चारुलता भावे यांच्या हस्ते उभयतांचा गौरव करण्यात आला.
तसेच सेवाभावी वृत्तीने घरकुल वृद्धाश्रमाचे काम पाहणाऱ्या व्यवस्थापिका संध्या वेदक यांचा सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील कार्यादरम्यान आलेले विविध अनुभव उपस्थितांसमोर कथन केले.
या कार्यक्रमाला सोसायटीचे उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई, खजिनदार विनिता बाडगी आणि सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत आनंदाचे क्षण सामायिक करत आपुलकी, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश या भेटीतून दिला.
