गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेश पाटील यांचा बेळगावात सत्कार

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेश पाटील यांचा बेळगावात सत्कार

माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते गौरव; चंदगड तालुक्यासाठी ऐतिहासिक सन्मान असल्याची भावना

बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल बेळगाव येथे त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी हनुमाननगर येथील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत त्यांचा गौरव केला.

बेळगाव सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या हस्ते राजेश पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, अनिल अंबरोळे, प्रसाद मरगाळे, उल्हास निंबाळकर, सुनील शिंदे, राजेश लोहार, विनायक बुरुड, सुनील चौधरी, बाबू पावशे, भारत बाळेकूंद्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गोकुळ दूध संघाच्या इतिहासात प्रथमच चंदगड परिसरातील नेतृत्वाला अध्यक्षपदाचा मान मिळणे ही संपूर्ण चंदगड तालुक्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. राजेश पाटील यांच्या निवडीमुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागातील दूध उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

यावेळी प्राचार्य आनंद आपटेकर यांनी राजेश पाटील यांना मिळालेला सन्मान हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नसून संपूर्ण चंदगड परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली दूध व्यवसायाच्या विकासासोबतच सामाजिक, राजकीय आणि लोकहिताच्या विविध विषयांनाही चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अनिल अंबरोळे यांनीही राजेश पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी आजवर केलेले सामाजिक कार्य आणि जनसंपर्क यांची दखल घेऊन त्यांच्यावर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड योग्य आणि अभिनंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजेश पाटील यांच्या निवडीमुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच सीमाभागातील सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − 12 =

error: Content is protected !!